दिनदर्शिका आणि मार्गदर्शिका
अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांमधून, महापुरुषांच्या चरित्रामधून आपण आज शिकावे असे खूप काही असते आणि म्हणूनच इतिहास अभ्यासाने गरजेचे असते. शिवछत्रपती हे युगप्रवर्तक महानायक होते, मग त्यांच्या चरित्रातून, त्यांच्यापुढे आलेल्या प्रसंगाला त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून आपण आज काय बोध घ्यायला हवा?
नेमकं हेच सांगणारी नव्या वर्षाची दिनदर्शिका आणि शिवचरित्रातून बोध देणारी मार्ग दाखवणारी अशी मार्गदर्शिका देखील आम्ही आपणां सर्वांपुढे आणली आहे.
१२ महिन्यांसाठी वेगवेगळ्या वयातील शिवरायांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आणि त्यातून आज आपण घेऊ शकतो तो बोध हे दोन्ही ऑडिओ फॉरमॅट मध्ये आपल्यासाठी सादर करत आहोत.
January - स्वराज्य प्रस्थापनेचे अचाट ध्येय
एक जहागीरदाराचा मुलगा आपल्या वडिलांचा सुभा सांभाळायला म्हणून येतो. प्रतिष्ठित पराक्रमी असे आदिलशहाचे सरदार म्हणून काम करणाऱ्या आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी त्या सुभ्यात कमावलेल्या प्रतिष्ठेवर स्वार होऊन म्हणायला स्वतःचे असे छोटेखानी राज्य चालवत राहणे. हा तसा पाहायला जावे तर अतिशय सुलभ आणि प्रचलित मार्ग.
पण आपल्या आई-वडिलांकडून प्रेरणा घेऊन एकाच संस्कृतीचे पालन करणाऱ्या साऱ्यांवर त्यांच्या हिताची काळजी असलेले प्रशासन निर्माण करण्याचे उदंड स्वप्न त्याने उराशी बाळगले. स्वतःचे राज्य नाही तर इथे राहणाऱ्या प्रत्येकाला हे आपले राज्य आहे अशी जाणीव व्हावी असे स्वराज्य निर्माण करण्याचा तो उदंड निर्धार....
मग एवढं अचाट असं काही शून्यातून उभं करायचं म्हणजे अर्थात मार्ग सोपा कसा असेल?
अगदी बारा वर्षांचा हा मुलगा आजही आपल्याला शिकवतो की उंच ध्येय गाठावयाचे असेल तर मार्ग खडतर असणारच! निर्धार पक्का करून ते साधण्यासाठी सज्ज व्हावे!
February - उच्चतम ध्येयासाठी आयुष्य वेचा. फक्त स्वतःसाठी नव्हे.
अधिकृतपणे आदिलशाहीचा भाग असलेल्या सुभ्यात स्वतःचे प्रशासन निर्माण करण्यासाठी म्हणून आदिलशाहीतील दुर्ग एका मागोमाग जिंकल्यावर अर्थात जे व्हायचे ते झालेच. शिवरायांचे "बंड" मोडून काढण्यासाठी साडेसात हजारांचे सैन्य घेऊन फतेह खानाला धाडण्यात आले. यावेळी आदिलशहाने स्वतःच्याच सरदार असलेल्या शहाजी राजांना म्हणजे शिवरायांच्या वडिलांना नजरकैदेत टाकलेले होते. अजूनही प्रतिकार केल्यास थेट आपल्या वडिलांच्या जीविताला धोका आहे याची संपूर्ण जाणीव असूनही "स्वराज्याहून मोठे काही नाही" किंवा "सर्वप्रथम राष्ट्र" याच ऊक्तीचे पालन करत शिवरायांनी कडवा प्रतिकार केला, आणि फतेह खानाला हरवले.
आणि सहकारऱ्यांना एकदा हे लक्षात आलं की आपल्या नेतृत्वाला स्वतःसाठी काही नको, अगदी स्वत:च्या वडिलांच्या सुरक्षिततेपुढेही आपले नेतृत्व ध्येयाला प्राधान्य देते की मग पुढे जाऊन तानाजीरावांसारख्या माणसांना आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून जीविताला धोका असणाऱ्या सिंहगड जिंकून घेण्यासारख्या जोखीमेच्या मोहिमा पार पाडायला बळ मिळते.
अठरा वर्षांचा कवळा तरुण आजही आपल्याला शिकवतो की फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाच्या ऐहिक सुखाच्या विचारांपलीकडेचे ध्येय ठेवायला हवे. आणि सुनिश्चित केलेल्या ध्येयाच्या पूर्ततेपुढे बाकी कुठल्याही गोष्टीला प्राधान्य देता कामा नये.
March - तुमच्या पुढे काय आहे ह्याहून महत्त्वाचं तुम्ही त्यात काय पाहता हे असते!
पुरंदरचे युद्ध उलटून सहा वर्षे झाली होती. प्रशासनावर एव्हाना चांगली पकड बसवलेल्या शिवरायांना एक गोष्ट लक्षात आली होती आणि ती म्हणजे अर्थकारण साधायचे असेल तर फक्त शेतमालावर लादलेल्या करावर अवलंबून राहणे अशक्य आहे. स्वराज्यविस्तार समुद्रापर्यंत नेल्यास घाटावरील व्यापारी मार्गांवर कर लादून ते साधता येणार होते.
जावळीकर मोरे यांची प्रतारणा खूपत होतीच, अशावेळी स्वराज्याचा आकार एकदम चौपटीने वाढवण्याचा मार्ग म्हणजे जावळी स्वराज्यात आणायची.
स्वराज्यविस्तारासाठी आठही दिशा समोर दृष्टिक्षेपात असताना नेमकी जावळीची दिशा योजणारे २६ वर्षांचे शिवराय आपल्याला आजही सांगतात की अनेकदा अवघ्या दिशा समोर असतात. त्यातून मार्ग आपल्या कर्तुत्वाने काढावे लागतात. समोर वास्तविक पाहता सारेच काही असते, जे दिसते त्यापलीकडले पाहून अतिशय धोरणात्मक विचार करत योग्य दिशा ठरवून मार्गक्रमण करणे गरजेचे असते.
April - चौकट सोडून नव्हे तर ती भेदून कृती करण्याची धैर्य बाळगा
अनेक शतके अनेक एतद्देशीय राजांनी धर्मात सांगितलेली समुद्रबंदी पाळली होती. परप्रांतीय आक्रमकांनी देखील समुद्री सीमोल्लंघनाचा कधीही विचार न करता गरज पडेल तेव्हा पाश्चात्य व्यापाऱ्यांवर आपली भिस्त ठेवली होती.
सर्वसामान्यपणे ही अलिखित अशी चौकट आखून दिली गेलेली असताना "आपले स्वतःचे आरमार!" हा शिवरायांचा विचार कमालीचा अभिनव आणि चौकट सोडून केलेला होता हे लक्षात येते. पुढे त्यातून साधलेल्या गोष्टी पाहताना त्यामागील सुसंगत तर्क देखील कळतो, पण सुनिश्चित ध्येयाचा पाठलाग करताना आजवर कोणीही कधीही न अवलंबलेला मार्ग, 'केवळ तो कोणी अवलंबलेला नाही!' म्हणून दूर न ठेवता त्यातील संभाव्य अडचणींचा अंदाज घेऊन त्यावर मात करत स्वतःचा असा नवा आणि प्रशस्त मार्ग बनवणे हे शिवचरित्र आपल्याला शिकवते. तरुणांनी लक्षात घ्यावयाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवराय स्वराज्य नौदल निर्मितीच्या कार्याला आकार देते झाले तेव्हा त्यांचे वय अवघे 26 वर्षे होते.
May - नेतृत्वाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्वतःची कृती!
अफजल भेटायला तयार झाल्यावर, त्याची आजवरची दगाबाज प्रवृत्ती, आपल्या हेरांनी आणलेल्या माहितीवरून तो महाराजांवर हल्लाच करणार याची व्यवस्थित जाणीव असून देखील, वर सर्व अनुभवी मंडळींचे ही भेट टाळावी असे मत असताना महाराजांनी या संकटाला स्वतः सामोरे जायचे ठरवले. तसे पाहायला जावे तर एखादा तोतया पाठवून देखील चालले असते की...
पण सगळ्यात अवघड परीक्षेच्या वेळी नेतृत्व स्वतः त्यास सामोरे जाते हे पाहणाऱ्या अनुयायांसाठी किती बरं प्रेरणा देणार असेल?
अफजलाला स्वतः सामोरे जाऊन महाराजांनी नेमके तेच साधले.
आपल्याही प्रवासात अनेक आव्हाने येणार पण शिवरायांचे नाव घेत प्रसंगी स्वतःही धैर्य ठेवून त्यास सामोरे जाणे हेच सर्वार्थाने सुयोग्य असते.
29 वर्षाचा तरुण आजही आपल्याला नेमके हेच सांगत नाहीये का?
June - नेतृत्वाच्या ठायी आत्मविश्वास हवा फाजील आत्मविश्वास नव्हे!
अफजलला संपवल्यावर विजयोत्सवात उन्नत होऊन सारे काही विसरावे, सोहळे साजरे करत रहावे अशांतले काही शिवराय नव्हते. त्यांनी अगदी दुसऱ्याच दिवशी स्वतः एका मोर्चाचे नेतृत्व करत पन्हाळगडापर्यंत आपण स्वराज्यसीमा वाढवली. संधी साधून पुढेही अगदी मिरज पर्यंत गेले.
मिरजेच्या दुर्गाला वेढा देऊन बसले असताना जेव्हा सिद्दी जौहर नावाचे एक मोठे संकट अंगावर येते आहे हे लक्षात आले तेव्हा आत्तापर्यंत आत्मविश्वासाने एकामागोमाग विजय मिळवणाऱ्या शिवरायांनी अतिशय विवेकाने माघार घेत पन्हाळगडावर येणे पसंत केले.
सलग मिळणाऱ्या विजयांची धुंदी नेतृत्वाच्या धोरणांवर परिणाम करणारी नसावी.
आपल्यालाही ध्येयाकडील वाटचाल करत असताना मिळणाऱ्या यशाने धुंद न होता धोरणात्मक विचार करून कुठे थांबावे, कुठे माघार घ्यावी हे लक्षात यायला हवं!
हीच शिकवण हा ३० वर्षाचा तरुण ३०० वर्षांनंतर देखील आपल्याला देत आहे.
July - जोखीम पत्करल्याशिवाय अलौकिक यश साधता ये त नाही!
तीन वर्षे लाल महालात येऊन राहणाऱ्या शाहिस्तेखानाने पुणे सुभ्यात लोकांचा अनन्वित छळ केला होता. बलशाली मुघलांचे संपूर्ण सामर्थ्य त्याच्या पाठीशी होते. अशात रणभूमीवर त्याला नमवणे केवळ अशक्यच होते.
पण म्हणून काहीही न करता स्वस्थ बसूनही राहता येणार नव्हते. अशावेळी एका अनन्यसाधारण मोहिमेची आखणी केली गेली. तीन चार लाखांच्या मुघल सैन्याच्या गराड्यात आपल्या लाल महालात चैनीत राहणाऱ्या शाहिस्तेखानावर मुठभर मावळे घेऊन स्वतः शिवरायांनी हल्ला करायचे ठरवले.
केवढी मोठी जोखीम होती ही?
पण प्रसंगी अशा प्रकारची जोखीम उचलल्याशिवाय कुठलीही सकारात्मक गोष्ट घडणे शक्य होणार नव्हते.
तसे तर शाहिस्त्याला संपवायच्या उद्देशानेच मारलेला हा छापा होता, एक सर्जिकल स्ट्राइक होता; पण तीन बोटांवर प्रकरण निभावले. शाहिस्तेखान वाचला पण शिवरायांनी उचललेल्या कमालीच्या जोखीमेच्या या मोहिमेने नेमके हवे ते यश मिळवून दिले. तीन बोटे गमवून या धाडसी छाप्याच्या तीनच दिवसात शाहिस्तेखानाने पुणे सोडले.
हवे ते उद्दिष्ट गाठत असताना कधी कधी अकल्पित अशी जोखीम देखील पत्करावी लागते त्याशिवाय यश मिळू शकत नाही. शिवछत्रपतींचा शाहिस्तेखानावरील सर्जिकल स्ट्राइक आपल्याला नेमके हेच शिकवतो.
August - अनेकदा क्षमतेपुरते करण्यापेक्षा जे जे करावे लागेल ते ते सर्व करण्याची धमक ठेवावी लागते
जितक्या मोठ्या क्षेत्राचे व्यवस्थापन करायचे तितकेच जास्त वित्तीय बळ पाठीशी असणे कुठल्याही प्रशासकासाठी गरजेचे असते.
तीन वर्षांहूनही जास्त वेळ पुण्यात राहून सर्वसामान्यांना छळणाऱ्या शाहिस्तेखानाने स्वराज्याच्या अर्थाजनाचे मार्गही अडवले होते.
स्वराज्याची आर्थिक बाजू पुन्हा सक्षम करण्यासाठी जी व्यवस्था सुरू होती तीच सुरू ठेवणे पुरेसे नव्हते. अवघे क्षमतेएवढेच न करता त्यापुढे जाऊन जे करावे लागेल ते करून आर्थिक घडी व्यवस्थित करण्याची गरज होती.
मुघल अधिपत्याखाली असलेले सुरत हे त्याकाळचे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यापारी बंदर! महाराजांनी त्यावरच छापा मारून स्वराज्य संपन्न करायचे ठरवले. स्वराज्याची सीमा ओलांडून, संपूर्णतः मुघल अधिपत्याखाली असलेल्या भागातून प्रवास करून, मुघलांच्याच संरक्षणात असलेल्या शहरावर छापा मारून; संपत्ती सुरक्षित परत आणणे ही अचाट सहसाची आणि जोखीमेची मोहीम होती. अशा प्रकारच्या मोहिमांचा अनुभवही आपल्याला फार नव्हता! पण अनेकदा क्षमतेपुरते करण्यापेक्षा जे जे करावे लागेल ते ते सर्व करण्याची धमक ठेवावी लागते. आणि महाराजांचा सुरतेवरील छापा नेमके आपल्याला हेच शिकवतो.
September - परिस्थितीजन्य माघार ही पुनरुत्थानाची पूर्वतयारी असायला हवी
स्वराज्याचे अस्तित्व मिटवण्याचा विडा उचललेल्या मिरझा जयसिंगाने सर्व ताकदीनिशी स्वराज्यविरुद्ध एकाच वेळी अनेक मोहिमा उघडल्या. या संकटाविरुद्ध जेव्हा कुठलीच योजना यशस्वी होणार नाही याची जाणीव झाल्यावर फक्त अहंकारापोटी आजवर उभारलेला स्वराज्यलढा मातीत मिळवण्याऐवजी शिवरायांनी तह करण्याचे ठरवले. आज अस्तित्व टिकवले तर उद्या पुन्हा उभा राहता येईल हा दूरदर्शी विचार यामागे होता.
कमालीच्या कष्टाने, साहसाने उभारलेल्या स्वराज्याचा 80 टक्के भाग मुघलांना कापून देताना तसे करणे भविष्यातील पुनरुत्थानासाठी आहे हे शिवरायांनी पुढे आपल्या कृतीतून पुढे दाखवले.
आपल्याला देखील आपापले पूर्वनियोजित ध्येय गाठण्याच्या प्रवासात अगदी संपूर्णतः संपून जातो कि काय असे आव्हानाचे प्रसंग येऊ शकतातच. पण अशा वेळी तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून पुनरुत्थान करणार असाल तर मार्गच निघत नसणाऱ्या खडतर प्रसंगात विवेकी माघार घेणे हे अयोग्य नसते. या प्रसंगातून शिवचरित्र आपल्याला नेमके हेच शिकवते.
October - प्रतिकूल तेथील विवेक हाही एक पराक्रमच असतो
आपल्या भावाला, भावाच्या मुलाला, बहिणीच्या नवऱ्याला, स्वतःच्या वडिलांना अशा मुघल तख्तावर बसण्यासाठी क्रूर औरंगजेबाने चाळीसहून अधिक नातेवाईकांची निघृण हत्या केलेली होती. या साऱ्यांचेच कमालीचे सामर्थ्यवान असणे देखील त्यांच्या कामी आलेले नव्हते.
आणि म्हणूनच आग्र्याला जेव्हा अशा क्रूरकर्मा शत्रूच्या तावडीत शिवराय सापडले तेव्हा त्यातून जिवंत सुटण्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे शिवरायांचे विवेकी वागणे.
भेटवस्तू देऊन औरंगजेबाच्याच माणसांना आपल्या बाजूने फिरवणे असो, "मला आता कशातच स्वारस्य नाही" असा भास निर्माण करणे असो किंवा आजारपणाचे नाटक करून विरक्तीचा आभास निर्माण करणे असो शिवरायांनी स्वतःची सुटका करून घेताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती अतिशय विवेकाने हाताळली. आणि म्हणूनच माणसाच्या इतिहासातील सगळ्यात चित्तथरारक असा "प्रिझन ब्रेक" ते घडवून आणू शकले. ध्येय साधताना अनेकदा आभाळाएवढे संकट डोक्यावर येऊ शकते, अशावेळी विवेकाने वागायला हवे, शिवचरित्रातील हा प्रसंग आपल्याला नेमके हेच शिकवतो.
November - तुमचे पुनरुत्थान तुमची ओळख बनावी, तुमच ी माघार नव्हे!
पुरंदरच्या तहात जवळजवळ सगळे काही गमावल्यावर मुघलांशी कसलेही वैर न पत्करता त्यांचेच मांडलिक बनून जगणे शिवरायांनी मान्य केले असते तर तीच त्यांची ओळख बनली असती. आज आपण त्यांचे चिंतन युगप्रवर्तक म्हणून करतो याचे कारण म्हणजे त्या तहानंतर आणि आग्र्याहून स्वतःच्या करून घेतलेल्या सुटकेनंतर चारच वर्षात सर्व पूर्वतयारी करून स्वराज्यविस्तारासाठी त्यांनी घेतलेली गरुडझेप!
वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीत कमावलेले सारे एका तहात गमावल्यानंतर पुनरुत्थानाच्या या मोहिमेत शिवरायांनी आधी गमावले होते त्याच्या दुप्पट अवघ्या तीनच वर्षात कमावले! आणि ती त्यांची ओळख बनली!
तेव्हा तुम्हालाही तुमच्या वैयक्तिक प्रवासात एखादे अपयश आले तर ते अपयश तुमची ओळख न बनता त्यावर मात करून तुम्ही केलेले पुनरुत्थान ही तुमची ओळख बनावी अशीच प्रेरणा शिवचरित्र आपल्याला देते.
December - तुमचे कर्तृत्व तुमचे भविष्य ठरवते परि स्थिती नाही
शिवछत्रपतींचे संपूर्ण जीवनच कमालीचे प्रेरणादायी असे होते. त्याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे शिवराज्याभिषेक!
एतद्देशिय व्यक्तीने स्वतःची अशी एक जागा निर्माण करायचा हा त्यापूर्वीच्या 400 वर्षातील पहिलाच प्रसंग. आणि कमाल म्हणजे अशी स्वतःची जागा निर्माण करताना जवळपासच्या सर्व अतिबलाढ्य शत्रूंचा टोकाचा विरोध होता.
म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिवरायांनी आपल्या कर्तृत्त्वाने असाध्य असे ध्येय साध्य केले. परिस्थितींवर मोठ्या निर्धाराने मात केली, त्यांच्या गहनतेच्या सबबीमागे लपले नाहीत. परिस्थितीहून महत्त्वाचे तुमचे कर्तुत्व आहे आणि तेच तुमचे प्रारब्ध ठरवत असते. शिवछत्रपती आपल्याला ही मोलाची शिकवण आजही देतात.