नेतोजी पालकर
नेतोजी ह्यांचे कर्तृत्व असे होते की खुद्द महाराजांनी अफझलच्या भेटीच्यावेळी, काही दगाफटका झाल्यास, पुढे नेतोजींच्या नेतृत्वात आणि जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वराज्याचा लढा पुढे न्यायचा असे आदेश दिले होते.
अफझलखानाच्या वधानंतर नेतोजींनी थेट विजापूरावरच आक्रमण केले होते. पुढे महाराजांना साथ देत पन्हाळगड मिळवणे, रुस्तम-ए-जमा चा मैदानी युद्धात सपाटून पराभव करणे, शाहिस्तेखानाच्या छाप्यानंतर महाराजांना सुरक्षित राजगडावर आणणे अशा अनेक मोहिमांत मोलाच्या भूमिका नेतोजींनी बजावल्या होत्या.
पुरंदरच्या तहानंतर त्यांना संभाजी महाराजांच्या वतीने मुघलांची मनसबदारी निभवावी लागली होती. पुढे मुघलांच्या हाती लागून मुघलांतर्फे ९ वर्षे त्यांना अफगाणिस्तानला जावे लागले होते, 'प्रति शिवाजी' म्हणवल्या गेलेल्या नेतोजींचा प्रवासदेखील छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच अनेक वादळांनी भरलेला होता.