गोदाजी जगताप
फार पूर्वीपासून आपल्याकडे वारीची प्रथा आहे. या वारीच्या संरक्षणाची जबाबदारी सासवडच्या जगताप कुटुंबीयांकडे होती. या कुटुंबातीलच एक वीर ऐन उमेदीच्या वर्षात स्वराज्यात दाखल झाले. गोदाजी जगताप त्यांचे नाव! पुरंदर युद्धात, फतेहखानाचा प्रमुख सरदार मोसेखानाला गोदाजींनी संपवले होते आणि स्वराज्यावर आलेल्या पहिल्याच आक्रमणात चमकदार कामगिरी केली होती.
पुढेही कोल्हापूरजवळ झालेल्या, रनदुल्लाखान विरुद्धच्या लढाईत गोदाजींनी स्वराज्यसेनेच्या एका तुकडीचे नेतृत्व केले होते. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला जाताना मुघलांच्या कचाट्यातून वाचवण्याची मोठी कामगिरी गोदाजींनी पार पाडली होती. अशाप्रकारे स्वराज्याच्या तीन-तीन छत्रपतींसाठी रणांगणे गाजवणाऱ्या वीरांमधील एक होते गोदाजी जगताप!